Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ५१

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ५१


दरवाजा बंद झाल्यावर त्या खोलीत एक वेगळंच शांतपण पसरलं होतं… बाहेर घर होतं… आणि आत त्यांचं छोटंसं जग…
गौरवीने आजूबाजूला नजर टाकली…
ती खोली...‌ तीच्या भिंती… आणि त्या खिडकीतून येणारा अर्धवट प्रकाश…

गौरवीला ती खोली अपमानाची वाटतं नव्हती… तर ती संघर्षाची सुरुवात वाटतं होती…

गौरवी खिडकीजवळ जाऊन उभी राहते…  मुंबई धावत होती…
जसं काही घडलेच नाही अशी…

ती हळूच म्हणते...
“इथे आलोय म्हणजे सगळं सोपं होईल असं नाही… मला माहित आहे…”

माधव तिच्या मागे येतो…
“हो…”

तो थोडा थांबतो… आणि मग म्हणतो...
“मी तुझ्यासोबत आहे… चुकलो तर चुक सुधारेल... पण तुला एकटी सोडणार नाही…”

गौरवी त्याच्याकडे वळते… डोळ्यांत भीती नाही… तर थकवा आहे… पण हार नाही…

“मला फक्त एवढंच हवं आहे माधव…”
ती शांतपणे म्हणते...
“तू नीट ऐक… व्यवस्थित समजून घे… आणि जेव्हा सगळे माझ्यावर बोट दाखवतील तेव्हा माझा हात सोडू नकोस…”

माधव तिचा हात घट्ट धरतो…
“तो हात सोडला तर मी स्वतःलाच गमावेन…”

तेवढ्यात बाहेरून आवाज येतो…
माधवची बहिण काहीतरी कुजबुजत असते…
आईचा कडक सूर ऐकू येतो… त्या आवाजांत
स्वीकार नव्हता… पण तिरस्कारही नव्हता…
तो तणावाचा मधला टप्पा होता…

गौरवी खोल श्वास घेते…
“हे लगेच बदलणार नाही… मला माहित आहे…”

माधव म्हणतो...
“पण प्रत्येक दिवस एक लढाई असेल… आणि प्रत्येक लढाईत
आपण एकत्र उभं राहायचं…”
गौरवी हळूच मान हलवते…

त्या रात्री कोणतीही भांडणं झाली नाहीत… कोणताही स्वीकार झाला नाही… पण एक गोष्ट नक्की झाली...

गौरवी झोपताना पहिल्यांदाच स्वतःला कमकुवत नाही,
तर तयार वाटत होती… आणि मुंबईच्या त्या घरात
एक नवी कथा सुरू झाली होती...

प्रेमाची नाही फक्त… तर स्वाभिमानाची, संयमाची
आणि टिकून राहण्याची…

हळूहळू गौरवी त्या घरात, त्या खोलीत स्थिरावली म्हणण्यापेक्षा राहू लागली...

त्या खोलीतलं तीच एकाकी आयुष्य सुरु झालं...

ती खोली लहान होती… पण तिच्याहून लहान गौरवीचं अस्तित्व लहान करून टाकणारी होती…
एक खिडकी… तीही नेहमी अर्धवट उघडी…
जणू हवेनेसुद्धा पूर्णपणे आत यायची परवानगी घेतलेली…

सकाळ झाली की संपूर्ण घर जागं व्हायचं…
पण गौरवीच्या खोलीत माधव कामाला गेला कि शांतता तशीच राहायची…

तिच्या हातात पुस्तक असायचं… पण डोळे वारंवार
दाराकडे वळायचे… कोणी बोलावेल…, कोणी हाक देईल…
या अपेक्षेत… पण तिच्या नावाची हाक त्या घरात कधीच गुंजली नव्हती…

रात्री माधव घरी परतल्यावर तो हळूच विचारायचा...
“आज दिवस कसा गेला…?”

आणि ती हसून म्हणायची...
“ठीकच…”

पण तो “ठीकच” त्या खोलीइतकाच कोरडा असायचा…



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all